सोलापूर जिल्हयातील कुर्डूवाडी नगर परिषदेत नियुक्ती
राजापूर / प्रतिनिधी : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची सोलापूर जिल्हयातील कुर्डूवाडी नगर परिषदेत बदली झाली आहे. तसे आदेश सोमवारी प्राप्त झाले असून भोसले हे लवकरच कुर्डूवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पद्भार स्विकारणार आहेत.
२१ मार्च २०२२ रोजी प्रशांत भोसले यांची राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली होती. आपल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात आपल्या आगळया वेगळया कार्यपध्दतीने त्यांनी प्रशासनावर आणि जनमानसातही आपला वेगळा ठसा उमटवला. नाम फाऊंडेशन व राजापूर शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, व्यापारी यांच्या सहभागातुल राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपशात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
नगर परिषदेतील प्रशासकिय राजवटीत त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले. शासनाच्या स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा या उपक्रमांसह अनेक योजना त्यांनी नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगले काम केले. तर शहरातील विकास कामांनाही त्यांनी शासनाच्या विविध योजना व निधीतुन चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोदवली येथील धरणाच्या प्रलंबीत कामाचा शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणेकामीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तर शहरासाठी नव्याने प्रस्तावित असलेल्या शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआर प्रस्तावाबाबत शासन स्तरावर आवश्यक ती माहिती पुरवून त्यालाही चालना देण्याचा प्रयत्न केला. शहरातील पाणीटंचाई काळातही त्यांनी सुयोग्य असे नियोजन करून शहरवासीयांना उपलब्ध पाणीसाठयातुन पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला.
प्रशासकिय राजवटीतही नागरिकांच्या कामांना प्राधान्य देत त्यांनी शहरातील अनेक कामांच्या पुर्ततेसाठी विशेष लक्ष दिले. लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करून शहरवासीयांन चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
तरूण तडफदार मुख्याधिकारी अशी ओळख असलेल्या भोसले यांनी आपल्या कार्यपध्दतीने शहरात एक वेगळा ठसा उमटवला. बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने व नवीन नियुक्त ठिकाणी तात्काळ रूजू होण्याचे निर्देश देण्यात आल्याने ते लवकरच कुर्डूवाडी नगर परिषदेत रूजू होणार आहेत. राजापूरकरांनी आजपर्यंत केलेल्या बहुमोल अशा सहकार्यामुळेच आपण चांगले काम करू शकलो अशी कृतज्ञताही भोसले यांनी व्यक्त केली आहे.
फोटो प्रशांत भोसले.