जखमी तिघेही रत्नागिरी कर्ला येथील, १२ वर्षीय मुलाचा अंगठा तुटला
अजित गोसावी / लांजा:-इर्टिगा कार व दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत रत्नागिरीतील तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली. जयप्रकाश चव्हाण (३७ वर्षे), त्यांची पत्नी सोनाली स्वप्निल चव्हाण (३४ वर्षे) मुलगा श्रुजन स्वप्निल चव्हाण (१२ वर्षे सर्व रत्नागिरी कर्ला ) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी चालक राजेंद्र सत्यनारायण शाहू (वय-४३, ओसवाल भोईसर, मुंबई) हा आपल्या ताब्यातील इरटीका (एमएच ४८ सीसी ४४८२) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून लांजा येथील आपल्या मित्राकडे येत होता. मुंबई येथून लांजा येथे येण्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निघाला होता. इर्टिगा गाडी मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे धनावडे शेती फार्म येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान आली असता. समोरून लांजा ते रत्नागिरीच्या दिशेने जाणारी दुचाकी स्प्लेन्डर (एमएच ०८ एजे ०९३४) यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक बसली. यावेळी दुचाकी चालक स्वप्नील जयप्रकाश चव्हाण व त्याची पत्नी सोनाली स्वप्निल चव्हाण, मुलगा श्रुजन स्वप्निल चव्हाण हे जखमी झाले.
अपघातात दुचाकी चालक स्वप्निल चव्हाण आणि मागे बसलेली त्यांची पत्नी सोनाली चव्हाण व दोन मुले श्रुजन आणि सर्वज्ञ हे महामार्गावर जोरदार आदळले. त्यामुळे स्वप्नील आणि त्याची पत्नी सोनाली या दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यांसह १२ वर्षीय श्रुजन याच्या पायाचा अंगठा तुटला आहे. अपघातानंतर तिघांनाही रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.ए.कांबळे हे अधिक तपास करत आहेत.