ठाणे:-वन्यजीव तस्करी करणाऱ्या बड्या मोहऱ्यासह टोळीचा छडा लावण्यात डब्लु डब्लु ए (वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन) या वन्यजीव संरक्षक संघटनेला यश आले आहे. मेरठहून बांद्रा टर्मिनस (मुंबई) येथे येणाऱ्या ट्रेनच्या एसी कंपार्टमेंटमधुन पोपटांची तस्करी करणाऱ्या रेल्वे अटेंडंटला मुंबई, वनविभाग आणि डब्लु डब्लु ए च्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीत क्रॉफर्ड मार्केटमधील वन्यजीव तस्करीतील मुख्य आरोपी मोहम्मद ईब्राहिम याच्यासह चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, एक दुर्मिळ रेड ब्रेस्टेड पोपट, ४० स्टार कासवे आणि ७० च्या आसपास पोपट अशी ११५ वन्यजीवांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. अशी माहिती डब्लु डब्लु ए चे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली.
गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरु असताना ०६ सप्टेंबर रोजी मेरठ – बांद्रा मेलच्या एसी कंपार्टमेंटमधून वन्यजीवांची तस्करी होत असल्याची खबर रेल्वेतील एका दक्ष प्रवाश्याने डब्लु डब्लु ए ला दिली. त्यानुसार, ठाणे जिल्हा वन्यजीव रक्षक रोहित मोहिते, सदस्य सुशील गायकवाड, अभिजीत मोरे, श्लोक सिंग, सुवेद रासम आदीच्या पथकाने बांद्रा टर्मिनसला फिल्डिंग लावली. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने ४४ पोपटांसह अटेंडंटच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत हे वन्यजीव क्रॉफर्ड मार्केटमधील बडा वन्यतस्कर मोहम्मद ईब्राहिम याने मागवल्याचे समोर आल्याने पथकांनी क्रॉफर्ड मार्केटबाहेर सापळा रचून मोहम्मद ईब्राहिमच्या डिलिव्हरी बॉयला पकडले. या डिलिव्हरी बॉयला खाकी हिसका दाखवताच त्याने ईब्राहिमचे मुख्य गोदाम दाखवले. त्या गोदामातून महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, एक दुर्मिळ रेड ब्रेस्टेड पोपट, ४० स्टार कासवे आणि ३० च्या आसपास हिरवे पोपट असे एकुण ११५ वन्यजीव संपूर्ण कारवाईत सापडले. पथकाने मोहम्मद ईब्राहिम यालाही जेरबंद केले. हस्तगत केलेल्या सर्व वन्यजीवांची ठाणे सीपीसीए येथे पशुवैद्यकिय तपासणी करून त्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. मुख्य आरोपी मोहम्मद ईब्राहिम हा बडा वन्यजीव तस्कर असून तो देशातील विविध शहरांमध्ये तसेच शेजारी राष्ट्रांमध्येही वन्यजीव तस्करी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या कायद्यानुसार वन्यजीवांची विक्री करणे किंवा जवळ बाळगणे याकरीता कारावासाची शिक्षा किंवा १ लक्ष दंडाची अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तरी, कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री किंवा जवळ बाळगू नये. असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.