रत्नागिरी : रत्नागिरीतील फुल विक्रेत्यांना यावर्षी बाप्पा पावला आहे. गणेशोत्सवात फुल विक्रीतून 10 लाखांची कमाई झाली आहे. यामध्ये झेंडू, लिली, शेवंती, अष्टर या फुलांच्या हारांना मोठी मागणी मिळाली. गेल्या आठवडाभरात दररोज रत्नागिरी शहरातील फुलवाल्यांकडून दिवसाला सात ते आठ टन झेंडूची फुले, हार विक्रीस गेले आहेत. यातून सुमारे दहा लाखांची उलाढाल झाली.
गणेशोत्सवाची धामधूम अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहणार आहे. गौरी – गणपती विसर्जनादिवशी बहुसंख्य घरगुती गणपतींना निरोप दिला जातो. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणरायाची पूजा, सजावटीसाठी पुलांना प्रचंड मागणी असते. त्यात दुर्वांसह झेंडू, लिली, शेवंता यांच्या फुलांचा हार वापरला जातो. अनेक ठिकाणी जास्वंदीची फुले मिळत नसल्याने बहुसंख्य घरांमध्ये झेंडूचे हार गणपतीच्या गळ्यात घालण्यासाठी वापरतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये हरतालिकेपासून फुलांच्या विक्रीला सुरूवात झाली आहे.
गणपती प्रतिष्ठापना, गौरी पूजन ते गणपती विसर्जनापर्यंत फुलांच्या हारांना प्रचंड मागणी असते. मूर्तींच्या उंचीप्रमाणे हार वापरले जातात. छोटी मूर्ती असेल तर हार छोटा असतो. सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती मोठ्या असल्यामुळे तिथे 10 फुटाहून अधिक उंचीच्या हाराला मागणी असते. यंदा गणेशोत्सवाच्या सुरूवातीला 150 रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाल्यो येथील फुलविकेत्यांकडून सांगण्यात आले. या विक्रीतून रत्नागिरीत 10 लाखांची कमाई झाली आहे.