रत्नागिरी नाचणे येथील 6 जणांवर गुन्हा
रत्नागिरी : शहरातील नाचणे येथे एका महिलेच्या घरात घुसून तिच्या नातेवाईकांनी जोरदार मारहाण करत व सोन्याच्या दागिन्यांचे नुकसान केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप बारक्या कीर, रुपाली दिलीप कीर, अमृता प्रसाद खेडेकर, श्रद्धा गणेश निमगरे, अनुजा दिलीप कीर, प्रसाद खेडेकर (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 6 संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ओमकार रेसिडेन्सी, नाचणे रोड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी
महिला हिचे नातेवाईक यांनी एकामागोमाग एक असे फिर्यादींच्या घरात घुसले. त्यावेळी संशयित दिलीप कीर याने फिर्यादी यांचे हात पकडले व इतर पाच जणांनी महिलेचे कपडे फाडून गळ्यातील मंगळसूत्र व हातातील ब्रेसलेट तोडून नुकसान केले. त्यांचा चार वर्षांचा मुलगा रडत होता. म्हणून त्या बाहेर आल्या. तरीही मारहाण केल्याचे पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादी यांची मावस बहीण संशयित अनुजा कीर हिच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादीनी तिला माझ्या भावाच्या नावावर जमीन करण्यासाठी पैसे घेतलेस, तरी अजून जमीन नावावर करुन का दिली नाही, असे बोलल्याचा राग होता. त्या रागातून या सहा नातेवाईकांनी मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.