गावात दारूबंदीचा ठराव
लांजा : तालुक्यामध्ये पोलिसांनी धाडी टाकून ६ ठिकाणी दारू धंदे उघडकीस आणले होते. त्यामुळे विनापरवाना दारू धंदे सुरू असल्याचे तालुक्याच्या निदर्शनास आले. अशातच नागरिक म्हणून आपली जबाबदारीची जाणीव करून लांजा तालुक्यातील वाघ्रट ग्रामपंचायतीने दारू बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
गावात दारू बंदीचा ठराव करून गावात दारू आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा ग्रामपंचायतीमध्ये सर्वानुमते ठराव करण्यात आला. लांजा तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल असे काम वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीने केले आहे.
दारू बंदीचा निर्णय घेणाऱ्या वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीची दखल तालुका तसेच जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. असेच दारू बंदी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे सुज्ञान नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लांजा तालुक्यात दारू बंदी विरोधात पोलिसांचे पाऊल कौतुकास्पद असून तालुक्यात अवैध दारू धंदे पूर्णतः बंद व्हायला हवेत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने गावांमध्ये पूर्णत: दारूबंदीवर ठराव एकजुटीने केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे तालुक्यातून कौतुक केले जाते आहे. तालुक्याच्या पश्चिमेला असणारी ही ग्रामपंचायत सद्ध्या लक्षवेधी ठरली आहे. ऐन गणेशोत्सवांमध्ये दारूबंदीचा घेतलेला निर्णय सर्वांसाठी आदर्शवत ठरला आहे. असा आदर्शवादी निर्णय इतर ग्रामपंचायतीनेही घ्यावा नागरिकांतून व्यक्त होत आहे. ३० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला. तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वाडीलिंबू आणि वाघ्रट गावामध्ये बिअरशॉपी चालवण्यासाठी परवानगी अर्ज केले होते. मात्र नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने या मागणीला कडाडून तीव्र विरोध केला होता. त्यानंतर दोन्हीही गावातील सुशिक्षित तरुण युवकानी, ग्रामस्थांनी, महिलांनी एकत्र येऊन दारु बंदी करण्याचा विचार मांडला. या संदर्भात तत्काळ नागरिकांची एकजूट झाल्याने ग्रामपंचायतीने या निर्णयाचे स्वागत केले. तसेच सभेमध्ये दारू बंदीचा नागरीकांच्या सर्वांनुमाताने ठराव मंजूर केला.
सद्ध्या तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. अनेक कुटुंब, संसार उध्वस्त होत आहेत. याची उदाहरणे देत बिअर शॉपी साठीचा केलेले अर्ज नागरिकांनी फेटाळून लावत तशीच दारु बंदीसाठी एकजुट दाखवली. गणपती उत्सवामध्ये जर कोणी गावात दारू साठा किंवा तसे गैरवर्तन आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल याबाबत ही जनमत झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुप ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय तालुक्यासाठी आदर्शवत असून त्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.