दापोली:-गणपती सणाच्या तोंडावर पुकारण्यात आलेला एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील ट्रव्हल्स मालकांनी प्रवाशांची अक्षरश लूट केल्याचे समोर आले आहे. या ट्रव्हल्सवर कुणाचाही अंकुश नसल्याने सुरू असणारी प्रवाशांची लूट तात्काळ थांबवावी व नियमबाह्य तिकीट आकारणाऱ्या ट्रव्हल्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. राज्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी गणपती सणाच्या पूर्वी संप पुकारला होता, यामुळे ज्यांनी एसटीचे बुकिंग केलेले होते, त्यांनी संपाची धास्ती घेऊन आपला मोर्चा खासगी ट्रव्हल्सकडे वळवला.
खासगी ट्रव्हल्सनेही ही नामी संधी असल्याचे मानून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली. साधारणत खासगी बसचे भाडे 500 रुपये असताना यंदा दापोलीत
येण्यासाठी तब्बल आठशे रुपये आकारण्यात आले. ही अव्वाच्या सव्वा लूट असली तरी गणपतीच्या ओढीने चाकरमान्यांनी ही लूट सहन केली.
दापोली- मुंबई दररोज प्रवास प्रवासी वाहतूक करणाऱया सुमारे 12 खासगी बस गाड्या दापोलीत आहेत. या एका बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करतात. या बसचे सर्वसाधारणपणे 500 रुपये प्रत्येक प्रवाशाला प्रवाशासाठी
तिकीट आकारण्यात येते. मात्र गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यात चाकरमान्यांना येण्यासाठी ट्रव्हल्स मालकांनी चक्क 800 पर्यंत भाडे आकारल्याचे पुढे आले आहे. वस्तूत या ट्रव्हल्स मालकांना एसटीच्या दरात एसटीच्या तिकीट दरापेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्याची मुभा आहे. या बाबत एसटी महामंडळाकडे चौकशी केली असता मुंबईचे साधारण भाडे 350 असल्याचे पुढे आले. या नियमाच्या आधारे बसचालकांनी जर 525 रुपये भाडे आकारले असते तर ते नियमात झाले असते. मात्र एसटी संपामुळे प्रवाशांची झालेली अडवणूक लक्षात घेता दापोलीतील खासगी बस चालकांनी प्रत्येक लहान-मोठ्या प्रवाशांकडून प्रत्येकी आठशे रुपये भाडे घेऊन गणेशभक्तांची अक्षरश लूट केली आहे. याकडे पोलीस यंत्रणा व आरटीओ का कानाडोळा का करत आहेत, असा प्रश्न दापोलीत उपस्थित होत आहे. शिवाय या बाबत दापोलीतील राजकीय संघटना व पुढारी देखील का मूग गिळून बसलेले आहेत, असा सवालही दापोलीत उपस्थित केला जात आहे.