चिपळूण:-चिपळूण शहरातील बहादूर शेखनाका येथे सकाळी 8 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असल्याने चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. हमीद शेख (38, कावीळतळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव नाव आहे.
दरम्यान चिपळूण मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हलवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तर काही संशयित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश आनंद जाधव (27, वडार कॉलनी, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसरा संशयित हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे.
खुनानंतर भर बाजारपेठेत हे दोघेजण संशयास्पद फिरताना सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनीच हमीदच्या डोक्यात दगड आणि फरशी घालून खून केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. अवघ्या तासाभरातच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. मात्र नेमके कोणत्या कारणासाठी त्यांनी खून केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही.