दापोली:-तालुक्यातील वाकवली कोंडवाडी येथे दुचाकी अपघातात अनिल रामचंद्र पिंपळकर या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 6 मे रोजी घडली होती. याबाबतची नोंद तब्बल 4 महिन्यांनी दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली. या प्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अनिल पिंपळकर (पुंभवे) खेडकडून दाकीने (एमएच 08 ए यू 8809) दापोलीकडे येत होते. ते स्वत: दुचाकी चालवत होते. ते वाकवली-कोंडवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर आले असता त्यांच्या ताब्यातील दुचाकीचा ताबा सुटल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद दापोली पोलीस स्थानकात 5 सप्टेंबर रोजी करण्यात आली असून अनिल पिंपळकर यांच्यावर स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगाधर करीत आहेत.