नवी दिल्ली:-पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या चमकदार कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने आज (४ सप्टेंबर) रोजी पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताचे २१ वे पदक जिंकले.
सचिनने १६.३२ मीटरचा थ्रो करून F ४६ प्रकारातील आशियाई सर्वोत्तम थ्रोची नोंद केली. हा थ्रो त्याच्यासाठी जागतिक पॅरालिम्पिकमध्ये एक महत्त्वाचा क्षण ठरला.
या स्पर्धेत कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटरच्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. मात्र, सचिनने त्याच्या प्रभावी कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. सचिनच्या यशामुळे भारताने ४० वर्षांनंतर गोळाफेक स्पर्धेत पुन्हा एकदा पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे, त्यामुळे या खेळातील भारताचा दुष्काळ संपला आहे.
सचिनशिवाय या स्पर्धेत भारताचे मोहम्मद यासर आणि रोहित कुमार हे दोन खेळाडू सहभागी झाले होते. यासरने १४.२१ मीटर आणि रोहितने १४.१० मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत अनुक्रमे ८ वे आणि ९ वे स्थान मिळवले. मात्र, सचिनने आपल्या ६ वैध थ्रोमधून सुरुवातीपासूनच टॉप-२ मध्ये स्थान कायम ठेवले.
सचिनच्या यशामागे त्याच्या कठोर परिश्रमांची आणि प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका आहे. सचिनने २०१७ मध्ये जयपूर नॅशनलमध्ये ५८.४७ मीटर फेक करून आपले पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०२३ मध्ये पॅरिसमध्ये १६.२१ मीटरच्या आशियाई विक्रमासह त्याने जागतिक पॅरा विजेतेपद पटकावले. हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने १६.०३ मीटर फेक करत विजेतेपद मिळवले.
भारताने यावर्षीच्या पॅरालिम्पिकमध्ये आता २१ पदके जिंकली असून पदतालिकेत १९ व्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत ३ सुवर्णपदके, ८ रौप्यपदके आणि १० कांस्यपदके जिंकली आहेत. मागील पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती, मात्र यावर्षीच्या कामगिरीने भारताने तो विक्रम मोडला आहे. भारताचे खेळाडू अजूनही अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत, ज्यामुळे या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.