नवी दिल्ली:-पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून देशासाठी नऊ पदकांची कमाई केली आहे. या कामगिरीत दोन सुवर्ण, तीन रौप्य, आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
बॅडमिंटन SL3 प्रकारात नितीश कुमारने सुवर्ण पदक जिंकून देशासाठी दुसरे सुवर्ण मिळवले. डिस्कस थ्रो एफ ५६ स्पर्धेत योगेश कथुनियाने रौप्य पदक पटकावले. योगेशने पॅरिस पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत ४२.२२ मीटर लांब थ्रो करून दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ब्राझीलच्या क्लाउडनी बतिस्ताने ४६.८६ मीटर लांब थ्रो करून सुवर्ण पदक जिंकले.
भारताच्या अवनी लेखराने १० मीटर एअर रायफल एसएच1 स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचे आणखी एक कांस्य पदक मोना अग्रवालने जिंकले. महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत प्रीति पालने कांस्य पदक मिळवले. नेमबाज मनीष नरवालने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक मिळवून चौथे पदक भारताच्या खात्यात जमा केले.
या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी त्यांच्या अद्वितीय कौशल्याने देशासाठी मानाचा तुरा रोवला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही सर्वात मोठी पदकांची कामगिरी आहे, ज्यामुळे देशभरात आनंदाची लाट पसरली आहे.