रत्नागिरी:-उत्तम उद्योजिका होण्याची क्षमता महिलांमध्ये असते, असे प्रतिपादन अमृता ट्रॅव्हल्सच्या सौ. अमृता करंदीकर यांनी केले.
रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे बालाजी मंगल कार्यालयात आयोजित गणेशोत्सवपूर्व प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, महिलांनी उद्योग करणे सोपी गोष्ट नाही. त्यांना घरचे सगळे करून स्वतःसाठी वेळ द्यायचा असतो. महिलांनी चार गोष्टी सांभाळल्या तर व्यवसाय पुढे नेता येईल. वेळेचे व्यवस्थापन महिलांना उपजत येत असते. मनुष्यबळ सांभाळताना स्वतः आणि सहकारी, कोणात काय गुण आहेत हे जाणून घेऊन काम करून घ्यावे. पैशांचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. जास्त महत्त्व कोठे दिले पाहिजे, तत्काळ कुठे लक्ष दिले पाहिजे, ते काम करणे हे आवश्यक आहे. या गोष्टींमध्ये लक्ष दिले तर महिला चांगल्या उद्योजिका होऊ शकतात.
यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. ममता नलावडे यांनी स्टॉल्सचालक महिलांचे अभिनंदन केले. उत्कृष्ट दर्जा आणि कामातील सातत्य असले तरच उद्योग वाढतो, असे त्यांनी सांगितले. सौ. श्रेया केळकर यांनीही उद्योजिकांचे कौतुक करून अशा प्रकारे रत्नागिरी ग्राहक पेठेने समाजमाध्यमांचा चांगला वापर करून उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
पहिल्या दिवशी महिला सुरक्षा अभियानांतर्गत महिला व मुली यांचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनात गणपती पूजा साहित्य, कोकण मेवा, महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, पर्सेस, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, सौंदर्य प्रसाधने, साड्या, कुर्तीज, ज्वेलरी, हॅण्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, विविध ड्रेस मटेरिअल्स, गार्मेंटस्, दर्जेदार मसाले, खाद्य पदार्थ व स्नॅक्स उपलब्ध आहेत. उद्या (दि. १ सप्टेंबर) विविध प्रकारचे मोदक बनवण्याची पाककृती स्पर्धा आहे. हार्ट अटॅक आल्यावर करावयाचे प्रथमोपचार प्रशिक्षण याबाबत लायन्स क्लबतर्फे मार्गदर्शन करण्यात येईल.
२ सप्टेंबरला दुपारी स्पॉट गेम्स, फनी गेम्स, ३ सप्टेंबरला सायंकाळी ४.३० वाजता संगीतोपचार – म्युझिक थेरपी यावर राधा भट प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. त्यानंतर मंगळागौर स्पर्धेचे विजेते अभिलाषा ग्रुपचे सादरीकरण होणार आहे.