नवी दिल्ली : सध्या पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 ची स्पर्धा सुरु आहे. रविवारी भारताला दोन पदके मिळाली. धावपटू प्रीती पाल हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक पटकावले. या पदकासह भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत.
महिला गटातील 200 मीटर टी 35 अंतिम फेरीत 31.01 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रीती पालने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याआधी प्रीतीने महिलांच्या 100 मीटर टी 35 प्रकारातही कांस्य पदक जिंकले होते. अॅथलेटिक्समधील ट्रॅक प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी प्रीती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा महापराक्रम देखील प्रीतीने करुन दाखवला आहे.