पोलादपूर – मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात दुचाकी घसरून स्वार जखमी झाल्याची घटना रविवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. भानुदास लक्ष्मण कारभळ ( ६५ रा. बीएसएनएल ऑफिस शेजारी खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, कारभळ हे आपल्या ताब्यातील एक्टिवा घेऊन खेडच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी कशेडी घाटातील बोगद्यात आले असता चिखलामुळे दुचाकी घसरून कठड्यावर जोरदार आदळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समेळ सुर्वे, सहाय्यक फौजदार सचिन सावंत, पोलीस हवालदार शंकर कुंभार, गजानन रामागडे, संजय चिकणे यांचे सह श्री काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, पोलादपूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार श्री बामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकी स्वार भानुदास कारभळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.