संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात वांद्री येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाला
विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शुक्रवारी संगमेश्वर पोलीस अटक केली. संजय वसंत मुळ्ये (47 वर्षे रा. आंबेड बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता १७५ (१) (१),७५ (१),४ पोस्को अधिनियम ८,९(क),१०,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून रत्नागिरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्री येथील शाळेमध्ये कार्यरत असणारा संजय मुळ्ये हा पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत होता. २७ ऑगस्ट रोजी तो शाळेतील पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील वर्तन करत असताना लक्षात आले.
पीडित मुलींनी कंटाळून सारा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच ग्रामस्थांच्या सभा बोलावली. या सभेत त्या शिक्षकाला धारेवर धरण्यात आले. संतप्त पालकांनी मुलींनी केलेल्या तक्रारीबाबत जाब विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. शेवटी पालक व ग्रामस्थांनी त्याला चांगलेच धारेवर धरले यावेळी तो सुतासारखा सरळ झाला. आता आपल काही खर नाही हे लक्षात आल्यावर त्याने तोंड उघडले. त्याने आपल्या हातून नकळत चूक झाल्याचे म्हटले. त्यानंतर त्याने माफी मागून सुटका करण्याचा डाव रचला. मात्र हाता पाया पडू लागला. गायावया करू लागला. मला एकदा माफ करा. परत चूक होणार नाही, अशी दयेची याचना पालकांसमोर करू लागला. मात्र संतप्त पालकांनी त्याला विवस्त्र करून धिंड काढण्याचे ठरवले. शाळेत राडा झाल्याचे सर्वत्र कळताच आजूबाजूच्या परिसरातील ही लोक जमा झाले. मोठा जमाव एकत्र जमला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. डी. वाय. एस. पी. माईन आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत त्या नराधम शिक्षकाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याला संगमेश्वर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही साठी आणले. यावेळी पोलीस ठाणे आवारात सुद्धा मोठा जमाव जमला होता. घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार व कोणताही उद्रेक होऊ नये या करिता रत्नागिरी येथून 30 RCP पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली होती .
जमलेला जमाव हा शांतच होता तरीही DYSP माईन यांनी जमावाला शांत रहाण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन करून दोषीवर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे सांगितले त्यानंतर जमाव शांत झाला. याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करून आज शनिवारी 31 रोजी जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.