नांदगाव सुनिता पवार खून प्रकरण
चिपळूण – तालुक्यातील नांदगाव येथे झालेल्या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. बेवडा म्हणून हिणवले याचा प्रचंड राग डोक्यात गेल्याने संशयिताने सुनिता पवार यांना संपवले. स्वप्नील खातू (३८, घाटकोपर, मुंबई) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास 24 तासाच्या आत लावून संशयिताला ताब्यात घेतले. यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चिपळूण तालुक्यातील नांदगाव खुर्द गोसावीवाडी येथील सुनीता परशुराम पवार या ६५ वर्षीय महिलेला डोक्यात गॅस सिलेंडरची टाकी घालून खून करण्यात आला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. मात्र सुनिता यांचे पती परशुराम पवार हे दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी आले तेव्हा पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. परशुराम पवार यांनी तात्काळ सावर्डे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षात महिलेचा खून झाला त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे स्थानिक गुन्हे विभाग तसेच पोलिसांनी वस्तुस्थितीजन्य पुरावे गोळा करत तपासला सुरुवात केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत सखोल पाहणी केली आणि पुढील तपासाबाबत पोलीस पथकाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. तसेच रत्नागिरी येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने तसेच स्थानिक गुन्हे विभाग आणि सावर्डे पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरात व आजूबाजूला देखील त्यांनी माहिती घेतली त्यानुसार काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. पोलिसांना महिती देण्यात सप्नीलच पुढे होता. त्या आधारावर पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनी शोधला. सुनीता पवार यांच्या घराशेजारीच स्वप्नील खातू याचे घर असून त्याच्या नवीन घराचे काम सुरू आहे. तो मुंबईत बीएसटीमध्ये नोकरीला आहे. घराचे काम सुरू असल्याने तो गावी आला होता. त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. खुनाच्या दोन-तीन दिवस आधी मयत सुनीता यांनी स्वप्नीलला बेवडा म्हणून हिणवले होते. त्याचा प्रचंड राग स्वप्नील याच्या डोक्यात शिरला होता. मंगळवारी दहीहंडीच्या निमित्ताने कोणीही नसल्याची संधी संधी साधत त्याने सुनीता यांना “तू मला बेवडा” का बोललीस असा जाब विचारू लागला. त्यावेळी दोघांची बाचाबाची झाली. रागाच्या भरात स्वप्नीलने सुनिता याना ढकलून दिल्याने त्या खाली कोसळल्या. त्या उठण्यापूर्विच त्याने संधी साधत जवळच असलेला सिलेंडर उचलून त्यांच्या डोक्यात घातला. त्या ठार झाल्याची खात्री होताच स्वप्नीलने मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पसार झाला. ही घटना घडली तेव्हा घरात तसेच आजूबाजूला कोणीही नसल्याने कोणालाच या घटनेची कल्पना नव्हती. त्यामुळे तपास करताना पोलिसांसमोर देखील अनेक प्रश्न होते. परंतु सखोल माहिती घेतल्यानंतर आणि माहिती देणारा स्वप्नील यांच्यातील घटनेशी साम्य आढळल्याने पोलिसांचा संशय थेट शेजारी राहणाऱ्या स्वप्नीलकडे गेला. अखेर बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता पोलिसांनी स्वप्नील खातू याला ताब्यात घेतले. तो माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.