संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी व ऐतिहासिक स्थळांवर नेले जाते. तेथे जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी समरस होऊन ते दृश्य कागदावर उमटवितात. तेथील झाडे, डोंगर, नदी, घरे, माणसे अशी विविधांगी रेखाटने विद्यार्थी आपल्या कलेतून उमटवितात.
या वर्षी शैक्षणिक सहलीचे ठिकाण हे चिपळूण तालुक्यातील आबिटगाव -खांडोत्री होते.हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत खूप दुर्गम भागात निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहे. या गावाला मोठ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगां, सकाळी धुक्यामध्ये झाकोळलेले डोंगर व त्यावर पडणारी सूर्याची किरणे त्यामुळे दिसणारे मनमोहक दृश्य विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमात कागदावर उमटविले.
या शैक्षणिक सहली दरम्यान कलाशिक्षक चित्रकार सुशीलकुमार कुंभार यांनी चित्र प्रात्यक्षिकाबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद सादला. मुलांच्या मनातील अगणित प्रश्नांचे निरसन केले.
त्याचबरोबर चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के सर,प्राचार्य. माणिक यादव व प्राध्यापक वर्गांनी वेगवेगळ्या माध्यमात कामे केली. विद्यार्थ्यांनी कामाबरोबर सहलीचा मनसोक्त आनंद लुटला अशा या विविधांगी नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात यावर्षीची शैक्षणिक सहल पार पडली.
या शैक्षणिक सहली दरम्यान मुलांनी काढलेल्या चित्रांचे कलाप्रदर्शनाचे उदघाट्न स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह,हॉटेल आदर्श डायनिंग येथे दि.२८ ऑगस्ट २०२४ या दिवशी सायं ५ वा. संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उदघाटक सह्याद्रि क्रीडा प्रबोधिनी सावर्डे चे अध्यक्ष मा.श्री. अनिरुद्ध शेखर निकम लाभले , प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. महेश मनोहर महाडिक- सेक्रेटरी, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा.प्रकाश अर्जुन राजेशिर्के -चेअरमन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे, माणिक यादव -प्राचार्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट तसेच प्राध्यापक वृंद, कलारसिक,विद्यार्थिवर्ग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कलाप्रदर्शनात १००हून अधिक चित्र मांडलेली आहेत यातून विद्यार्थ्यांच्या चित्र शिल्पांना पारितोषिक देण्यात आली.यातून उत्कृष्ट सात व विशेष पाच पारितोषिक काढण्यात आली.उत्कृष्ट कलाकृती पारितोषिक – सुजल निवाते,तुळशी भुवड, प्रथमेश गोंधळी, भूषण थवी, साहिल परुळेकर, नवाज हमदुले,भार्वी गोरुले विशेष पारितोषिक – सौरभ साठे,विशाल मसणे, तन्वी गोरविले, मिथिल अंगचेकर,सिद्धी मांडे, साक्षी जाधव यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच सुशीलकुमार कुंभार पुरस्कृत विशेष रेखांकन पारितोषिक साक्षी जाधव हिला देण्यात आले.
तसेच त्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलावस्वरूपात विक्री होणार आहे. प्रदर्शन उद्घाटनानंतर कला रसिकांचा इतका उदंड प्रतिसाद मिळाला की, प्रदर्शनातील जवळजवळ १५ चित्रे विक्री झाली आहेत.हे कला प्रदर्शन दि.२८ ऑगस्ट २०२४ सायं ०५ वा सुरु होईल ते दि ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी १०वा. ते सायं ०७वा.सर्व कलाप्रेमी, कलारसिक यांनी या प्रदर्शनाचा आस्वाद घेऊ शकतात असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक
यादव यांनी केले आहे.