दोषींना तातडीने अटक करण्याची प्रशासनाकडे मागणी
रत्नागिरी:-शहरातील चंपक मैदानात युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील पिडितेची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश संघटक रोहित तांबे यांनी मंगळवारी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली व आर्थिक मदतीचा हातही पुढे केला .तसेच या प्रकरणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून युवती अत्याचार प्रकरणी संशयीतांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
देशभरात सुरू असलेले महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या परिस्थितीवर तांबे यांनी टीका केली आहे . सद्यस्थितीत लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज असून आर्थिक मदतीपेक्षा देखील जे महत्त्वाचे आहे ते करावे तसेच सध्याचे राज्यसरकार मात्र घोषणांचा पाऊस पडणारे असून लाडकी बहीण म्हणणाऱ्यांनी दीड हजार देण्यापेक्षा बहिणींचे समाजकंटकां पासून रक्षण करावे असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले आहे .कोकण विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष या जबाबदारीने ते मुंबईसह कोकणात अत्याचारीतांच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. तसेच अन्यायाला वाचा फोडण्याचा बेधडक प्रयत्न करीत असतात .दरम्यान मंगळवारी त्यांनी पीडित युवतीसह पालकांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले . त्याचप्रमाणे यापुढेही आपण कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी रिपाइं कोकण प्रदेश संघटक रोहित तांबे यांच्या सह एमबीबीएस फाऊंडेशनचे दादा जाधव , मिलिंद पंडित रत्नागिरी तालुका युवक सचिव निखिल कांबळे देवरुखचे प्रसिद्ध उदयोजक व रिपाइं शाखा प्रमुख अक्षय जाधव संगमेश्वर युवक तालुका अध्यक्ष विनोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.