दापोली : दापोलीत सध्या वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. शहरात मच्छीमार्केटलगत मुख्य मार्गावर चालत जात असताना रस्त्यालगत असणाऱ्या एका झाडाची सुकी फांदी महिलेच्या डोक्यात पडून महिला जखमी झाली. या महिलेवर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
सध्या वेगवान वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे घरांलगत व रस्त्यालगतच्या झाडांच्या सुकलेल्या फांद्या धोकादायक ठरत आहेत. ही धोकादायक झाडे, फांद्या तोडण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, दापोलीत आतापर्यंत ३५५८.७ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ३१२८ मि.मी. पावसाची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केली होती. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला आहे.