लांजा : शहरातील विविध समस्यां संदर्भात निवेदन देऊनही लांजा नगरपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी लांजा शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या शहर समन्वय समितीचे पदाधिकारी लांजा नगरपंचायतीवर २९ ऑगस्ट रोजी धडक देणार असल्याची माहीती समन्वय समितीचे पदाधिकारी प्रसन्न शेट्ये यांनी पत्रकारांना दिली.
लांजा शहरातील विविध समस्यां संदर्भात लांजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची लांजा शहर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेवून लांजा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा केली होती. यामध्ये प्रामुख्याने नगरपंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांची सध्या दुरावस्था झालेली असून अनेक ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नसल्याने तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे शहरात मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव देखील वाढला आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्याचबरोबर शहरातील ज्या-ज्या ठिकाणी निवासी संकुले आहेत अशा निवासी संकुलांचा सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक संकुलांनी आपले सांडपाणी हे नजीकच्या वहाळ किंवा पऱ्यात सोडलेले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका अधिक असून भविष्यात निवासी संकुल रहिवासी किंवा बिल्डर यांना परवानगी देताना येथील सांडपाण्याचा प्रश्न कसा सोडवला आहे का? हे पाहूनच परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच शहरात अनधिकृत घरांची संख्या देखील आहे. नगरपंचायतीकडून अनधिकृत घरे म्हणून घरपट्टी आकारली जाते. त्या तुलनेत त्यांना वीज मीटर किंवा नळ जोडणी व अन्य सेवा सुविधा मिळत नाहीत. याचा विचार करून अशा अनधिकृत घरांना कायदेशीर परवानगी मिळण्याची दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली होती. याबरोबरच शरीरातील अनेक विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली होती.
दरम्यान, यावेळी मुख्याधिकारी श्रीम.हर्षला राणे यांनी याबाबत योग्य तो तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी समन्वय समिती नगरपंचायतीवर धडक देणार असल्याचे प्रसन्न शेट्ये यांनी यावेळी सांगितले.