गुहागर : तालुक्यातील वेळंब नालेवारी येथील शुभदा शरद पवार यांचे घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा तपास करण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना बोलावण्यात आले होते.
तालुक्यातील वेळंब नालेवारी येथील शुभम शरद पवार यांच्या बंद घराचे 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 25 ऑगस्ट पहाटे 3 या वेळेत दर्शनी दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून दरवाजा उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये घरातील एकही रूपयाची चोरी झाली नसली तरी घरफोडी झाली असल्याने रविवारी श्वान पथक बोलावण्यात आले होते. श्वान घरापासून आबलोली रस्त्याच्या दिशेने सुमारे 300 मिटरपर्यंत शोध घेत गेले, त्यानंतर ते थांबले. ठसे तज्ञांनी आवश्यक ते पुरावे घेतले आहेत. याबाबत गुहागर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ), 331(3), 331(4), 62 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.