रत्नागिरी : गोकुळाष्टमी निमित्त जिल्ह्यात आज बाळगोपालांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यानिमित्ताने जिल्हयात यावर्षी 251 सार्वजनिक तर 2,612 खासगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुवयास मिळणार आहे.
जिह्यात गतवर्षी (2023) 309 सार्वजनिक तर 3,043 खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहीहंड्यांमध्ये घट झाली आहे. जिल्हयात उभारण्यात येणाऱ्या विविध शहरातील सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिल्हाबाहेरची पथकेही येत असल्याने सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा लागली आहे. त्यामुळे दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.