मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे पुतळा कोसळला असा आरोप केला आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे कामाचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाची तोडफोड वैभव नाईक यांनी केली.
दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. याच घटनेवरुन आता आरोप प्रत्यारोपाचा फैरी सुरु झाल्या आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
तर सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील कंपनीला काळया यादीत टाकण्याची मागणी केली आहे.