यंत्रणेची उडाली झोप, मध्यरात्री लागले कामाला
देवरुख : मार्लेश्वर देवस्थान येथील दत्तगुरू मठात भाविक अडकल्याचा मेसेज संगमेश्वर तालुक्यातील शासकीय यंत्रणेला मिळाला अन या भाविकांना वाचविण्यासाठी रविवारी मध्यरात्री पोलीस व आपत्कालीन यंत्रणा थेट मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पोहोचली. या भाविकांकडून कोणता प्रतिसाद न मिळाल्याने चर्चेला उत आला होता. सोमवारी सकाळी हे भाविक सुखरूप असल्याचा संदेश शासकीय यंत्रणेला मिळाल्याने सुटका नि :श्वास टाकला. मात्र या घटनेमुळे शासकीय यंत्रणेची झोप उडाली होती
सविस्तर वृत्त असे की, मार्लेश्वर देवस्थान नजीक नदीपलीकडे दत्तगुरु मठ आहे. गगननिरी महाराजांचे शिष्य पवनगिरी चव्हाण यांनी हा मठ उभारला असून ते 40 वर्षे वास्तव्याला देखील होते. वयोमानामुळे ते कोल्हापूर येथे वास्तव्याला असतात. मात्र याठिकाणी श्रावण, दसरा, महाशिवरात्र, मकर संक्रांतीला येतात. गुरूवारी पवनगिरी चव्हाण महाराज व अन्य सात भाविक या मठामध्ये गेले होते. हा दत्तमठ नदीच्या पलीकडे आहे. पवनगिरी चव्हाण महाराज व भाविक ज्यावेळी मठात गेले त्यावेळी पाऊस नव्हता. यानंतर पावसाचे प्रसन्न वाढल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे त्यांना नदीपार करून येणे शक्य झाले नाही.
रविवारी रात्री चव्हाण महाराज यांचे पुणे येथील शिंदे नामक शिष्य यांनी कोकण आयुक्तांना संपर्क करून मार्लेश्वर येथील दत्तगुरू मठात गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याचे सूचित केले. यानंतर मात्र सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. मध्यरात्री 2 वाजता देवरूखचे पोलीस, तहसील कार्यालयाचे अधिकारी, राजू काकडे हेल्प ऍकॅडमीचे कार्यकर्ते घटनास्थळी रवाना झाले. बॅटरीच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. आवाज देखील देण्यात आला. मात्र पलिकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बचाव मोहीम थांबविण्यात आली.
शासकीय यंत्रणेचे अधिकारी सोमवारी सकाळी पुन्हा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पोहोचले. मठातून पवनगिरी चव्हाण महाराज व अन्य भाविकांना आम्ही सुखरूप असल्याचे सांगितले. यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत नदी ओलांडून येऊ नका अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. त्यांना आवश्यक साधनसामुग्री सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील देवदास सावंत यांनी दिली आहे.