बंद असलेल्या एस.टी फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची मनसेची मागणी
गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे व पावसाळी खड्ड्यांमुळे आर्थिक दृष्ट्या खोलात असलेली एसटी सेवा आणखीनच खड्ड्यात जाऊ लागली आहे.
जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागात प्रवासाचे एकमेव साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते, शालेय विद्यार्थ्यांना केवळ एसटीचाच मोठा आधार असतो.
येथिल बहुसंख्य रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात मात्र संबंधित विभागीय अधिकारी यांच होत असलेलें दुर्लक्ष,योग्य नियोजन अभावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची आज दुर्दश झाली असल्याची सर्वत्र ओरड आहे.खराब रस्त्यांमुळे तालुक्यात एसटीच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
गुहागर तालुक्यातील राज्य परिवहन बस मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी , खराब साईट पट्टी व रस्त्यांमुळे राज्य परिवहनच्या वाहनास अडथळा निर्माण होणाऱ्या रस्त्यांची यादी विभाग नियंत्रक ,रत्नागिरी यांना गुहागर आगाराच्या वतीने पाठविण्यात आली होती,त्यावर दक्षता घेत सदर मार्गावरील एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या,बंद एसटी फेऱ्यांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
या ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी श्रमदानाने केली असून या बंद करण्यात आलेल्या एस.टी.फेऱ्या पुन्हा सुरू होण्यासाठी तालुक्यातील शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात तक्रारी केल्यानंतर मनसेच्या वतीने गुहागर आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांच्याशी चर्चा करून सदरच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आले आहे, त्यानुसार अनेक फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून अत्यंत खराब असलेल्या रस्त्यांवरती मात्र एस.टी.वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सदरचे रस्ते सुस्थितीत झाल्यानंतर एस.टी. फेऱ्या सुरू करण्यात येतील असा विश्वास सोनाली कांबळे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अरुंद रस्ते असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या रुंदीने जास्त असल्याने अरुंद रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. साईट पट्टी खराब असल्याने अनेक वेळा एस.टी. कळंडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या मार्गावर मिनी किंवा मिडीबस उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सुजित गांधी, पत्रकार गणेश किरवे आदी मान्यवर उपस्थित होते.