गुहागर: दररोज २६ हजार कि. मी. अंतराचे उद्दिष्ट असलेल्या गुहागर आगाराला गेल्या आठ वर्षात एकही नवीन बस महामंडळाने दिलेली नाही. आगारात असलेल्या एकूण ६२ गाड्यांपैकी १९ गाड्या १४ वर्षांपूर्वीच्या असून पुढील वर्षी त्या वापरास अयोग्य होणार आहेत. यामुळे महामंडळाने आगाराला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी १८ नवीन गाड्या देणे गरजेचे आहे.
आग्रारप्रमुख सोनाली कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारात एकूण ६२ गाड्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ वर्षांपूर्वीच्या १४ गोड्या आहेत. ८ वर्षांपुढील ४१ गाड्या आहेत, तर ७ गाड्यांची १५ वर्षांची मुदत सपत आली आहे. २४२ चालक- वाहक कर्मचाऱ्यांमार्फत दररोजचे १९ हजार कि. मी.चे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र, गुहागरला दररोजचे २६ हजार कि. मी.चे उद्दिष्ट आहे. यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकूण ८० गाड्यांची आवश्यकता आहे. यामुळे अजून १८ गाड्यांची आवश्यकता आहे, तर मंजूर ४२६ कर्मचाऱ्यांमध्ये अजून २२४ चालक वाहक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. गुहागरसाठी एक विठाई व बीएसफोरच्या ४ गाड्या आल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आज आगारातील ७ मीटर लांबीच्या गाड्यांची दुरवस्था असून तालुक्यात २० फेऱ्यांकरिता ७ मीटर लांबीच्या चार गाड्यांची मागणी जिल्हा पातळीवर करण्यात आली आहे, तर महामंडळाच्या स्वतःच्या ४ शिवशाही मिळाव्यात, अशी मागणीही गुहागर आगाराकडून करण्यात आली आहे. 3