चिपळूण : तालुक्यातील कोंढेमाळ येथे अवैधरित्या खैर लाकूडसाठा वनविभागाकडून जप्त करण्यात आला असून या प्रकरणी साठा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाचे कर्मचारी कोंढेमाळ येथे गेले असता त्यांना मोहन वसंत होळकर व इतर पाच मजूर विना परवानगी बिगर शिक्का अवैधरित्या साठा करुन ठेवलेला खैर लाकूड माल सोलत असताना आढळले. 7.00 घ.मी लाकूड माल जप्त करुन होळकर याच्यावर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी अधिकारी राजेश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष परशेट्ये, वनरक्षक राजाराम शिंदे यांनी कार्यवाही केली.