जैतापूर / वार्ताहर
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी उसंत मिळावी सर्वांनी एकत्र येत आनंद साजरा करावा यासाठी देवदर्शनाचे निमित्त साधत राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडील भागात त्रिवेणी संघाच्या माध्यमातून महिलांना श्रावण महिन्यातील श्री देव कुणकेश्वर दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीमध्ये त्याच्या माध्यमातून संघटित झालेल्या नवेदर ,कोंडसर, भालावली ,मोगरे ,धाऊलवल्ली देवाचे गोठणे ,जैतापूर ,दळे ,कुवेशी ,तुळसुंदे मीठगवाणे, अणसुरे, दांडेवाडी ,आडीवाडी , आदी जवळपास पंधरा ते वीस गावातील सुमारे 300 महिला सहभागी झाल्या होत्या.
या सहलीसाठी राजापूर आगारातून महिलांसाठी असलेल्या 50% सवलतीच्या दरात सहा एसटी बसेस बुक करण्यात आल्या होत्या.
देवगड येथे सहलीसाठी निघालेल्या या महिलांना रत्नागिरी – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. शिवसेना शिंदे गटाचे राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या हस्ते जैतापूर येथे श्रीफळ वाढवून या सहलीचा शुभारंभ करण्यात आला.
देवगड कुणकेश्वर येथे पोहोचल्यावर कुणकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर अणसुरे येथील महिला व मुलींनी श्री देव कुणकेश्वराच्या दरबारात मंगळागौर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी श्री देव कुणकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्धे यांनी ट्रस्टच्या वतीने तर माजी सरपंच चंद्रकांत घाडी यांनी तर ग्रामस्थांच्या वतीने सर्व महिलांचे श्रीफळ देऊन स्वागत केले.
कुणकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ही सहल देवगड गार्डन मध्ये पोहोचली या ठिकाणी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्ष साक्षी प्रभू यांनी महिलांचे स्वागत करत सहलीला शुभेच्छा दिल्या. या गार्डनमध्ये देखील महिलांनी मंगळागौर नृत्य सादर केले.
या सहलीच्या आयोजनासाठी त्रिवेणी संघाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. ही सहल निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संघ पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यवस्थापक राजन लाड यांनी आभार मानले आहेत.