लांजा : लांजा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मटका जुगार खेळवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून जुगाराचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास लांजा बाजारपेठ येथील मच्छी मार्केटच्या मागे करण्यात आली.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन गजानन कांबळे (वय ४५ राहणार लांजा बौद्धवाडी) हा बाजारपेठेतील मच्छी मार्केटच्या मागे असलेल्या जागेत कल्याण मटका जुगार चालवत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लांजा बाजारपेठेमध्ये जाऊन धाड टाकली असता त्या ठिकाणी सदर राजन कांबळे हा कल्याण मटका या जुगाराच्या साहित्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी ४७० रुपयाची रोख रक्कम, एक बॉलपेन पांढऱ्या व पिवळ्या कागदाचे स्टेपलर पिना मारून तयार केलेले पावती पुस्तक असा एकूण ४७२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
स्वतःच्या फायद्या करिता कल्याण मटका जुगार चालवून जुगारासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून जुगाराचा खेळ खेळवण्या प्रकरणी तो आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नाईक जे.एस.मांजरे करत आहेत.