पावसाळी सहलीत चितारली शेकडो चित्र
संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी व ऐतिहासिक स्थळांवर ही सहल नेली जाते. तेथे जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी समरस होऊन ते दृश्य कागदावर उमटवितात. तेथील झाडे, डोंगर, नदी, घरे, माणसे अशी विविधांगी रेखाटने विद्यार्थी आपल्या कलेतून उमटवित असतात.
या वर्षी ही शैक्षणिक सहल चिपळूण तालुक्यातील खांडोत्री-आबिटगाव या निसर्गरम्य ठिकाणी गेली होती. तेथील मंदिर, आजूबाजूचा परिसर त्यावर पडणारी सूर्याची किरणे त्यामुळे दिसणारे मनमोहक दृश्य विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमात ७०हून अधिक चित्रे- शिल्पे चित्रित व शिल्पीत केली आहेत. या शैक्षणिक सहली दरम्यान मार्गताम्हानेचे कलाशिक्षक सुशील कुंभार यांनी चित्र प्रात्यक्षिकाबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद सादला. मुलांच्या मनातील अगणित प्रश्नांचे निरसन केले.कलाविद्यार्थ्यांना चित्र सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या. चित्रा बरोबरच पेन्सिल स्केच किती महत्वाचे आहे हे पटवून सांगितले. त्याच बरोबर कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के सर,प्राचार्य. माणिक यादव व प्राध्यापक वर्गांनी वेगवेगळ्या माध्यमात कामे केली.
या सहलीचा आस्वाद घेण्यासाठी ज्यांचे वेळोवेळी नवनवीन गोष्टींना पाठिंबा आणि मार्गदर्शन असते व कलेची ओढ असणारे कलारसिक असे अनिरुद्ध निकम यांनी देखील भेट देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांनी कामाबरोबर सहलीचा मनसोक्त आनंद लुटला अशा या विविधांगी नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात यावर्षीची शैक्षणिक सहल पार पडली.
या शैक्षणिक सहली दरम्यान मुलांनी काढलेली चित्रे प्रदर्शन स्वरूपात चिपळूण काणे हॉल या ठिकाणी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ यादरम्यान सकाळी १० वा.ते सायं.०७ वा.या दरम्यान होणार आहे. तसेच त्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलाव स्वरूपात विक्री होणार आहे. तरी सर्व कलाप्रेमी, कलारसिक यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.