रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्मचारी भरती प्रस्तावित आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. 90 गुणांसाठी 90 प्रश्न असतील. हे प्रश्न 90 मिनिटांत ऑनलाईन पध्दतीने सोडवावयाचे आहेत. या परीक्षेच्या तारखा, परीक्षा केंद्र या बाबतीत माहिती संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे उमेदवारांनी अवलोकित करावी, असे आवाहन बँक व्यवस्थापनाने केले आहे.
ऑनलाईन पध्दतीने होणारी ही परीक्षा उमेदवारांच्या गुणवत्तेला पूर्ण संधी देणारी असणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवर विश्वास ठेवावा. अकारण अन्य ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या बातम्या, होणाऱ्या चर्चा यामुळे विचलित होऊ नये, अगर चुकीच्या माहितीमुळे आपली दिशाभूल करून घेऊ नये. संकेतस्थळावर यूजर गाईडमध्ये असलेला प्रश्नसंच डेमो म्हणून दिला आहे. उमेदवारांनी या ऑनलाईन परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करून 90 गुणांपैकी अधिकाधिक गुण प्राप्त होतील, अशी तयारी करावी.
आत्मविश्वासाने ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाऊन आपण यश संपादन करावे, असे प्रसिध्दीपत्रक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढले आहे.