मुरुड : शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळेत आगरदांडा ते मुरुड शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येणा-या एस टी ला खोकरी जवळ अरुंद रस्त्यावर वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाला साईड देताना अपघात होऊन पलटी झाल्याने अकरा विद्यार्थ्यांना मुका मार लागला असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.संबंधित बांधकाम खाते आतातरी याकडे लक्ष पुरवून ठोस उपाययोजना करेल काय ? असा सूर जनमानसातून उमटत आहे.
मुरूड आगाराची मुरूड -आगरदांडा-मुरुड एम.एच.१४ बी.टी.१५९२ ही गाडी चालक संतोष शिकारे व वाहक समीधा मुकादम यांच्यासह शालेय विद्यार्थ्यासह पंधरा प्रवासी घेऊन आगरदांडा येथून सकाळी ८-०० वा.सुटून खोकरी जवळ वळणावर गाडी आली असता समोरून भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाला साईड देताना पावसामुळे तसेच याठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याची पाइपलाइनचे कामात माती आल्याने अचानक घसरुन पलटी झाली.गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते.यात आगरदांडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांना मुका मार लागला.त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
सदर अपघाताचे वृत्त समजताच नायब तहसीलदार संजय तवर,त्यांची टिम, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रहीम कबले, आगरदांडा येथील शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, युसुफ अर्जबेगी, सामाजिक कार्यकर्ते साकीब गजगे, शाळेतील शिक्षक कर्मचारी वृंद, पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना धीर दिला.मुरुड पोलिस व सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोसले घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.