चिपळूण:- बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन चिपळूणमधील महिलांच्या जनभावना उसळल्या. या घटनेचा आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महिलांनी आंदोलन केले. आम्हाला लाडकी बहिण योजना नको सुरक्षित बहीण योजना हवी, अशी मागणी करीत संतप्त महिला आंदोलकांनी केली. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महिलांनी आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात जाऊन महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
शंभरहून अधिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन कालुस्ते गावच्या माजी सरपंच डॉ. रेहमत जबले यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्त्या सुमती जांभेकर म्हणाल्या की, शासनाने अशा नराधमांवर कारवाई करण्यासाठी केवळ फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करून चालणार नाही. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा लवकर निर्णय लागत नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजे. स्वाती भोजने म्हणाल्या की, आरोपीला तात्काळ फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी केली. तसेच लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण योजना आणा, असे फलकही आंदोलकांकडून झळकले. चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष रेहाना बिजले म्हणाल्या, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली. त्यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल? याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार लाडकी बहीण योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिले कर्तव्य नाही का?, असा सवाल बिजले यांनी उपस्थित केला. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं बॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे, असे शामल तटकरे यांनी सांगितले. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अंजली कदम यांनी सांगितले. रुही खेडेकर म्हणाल्या की, अकोल्यामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, बदलापूरमध्ये चिमूरड्यांवर अत्याचार झाला. सरकारला त्याचे गांभीर्य आहे की नाही. आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवायचे की नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्रमध्ये हा प्रकार आता खूप वाढू लागला असल्याचे सांगितले. यावेळी महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या…