संगमेश्वर : तालुक्यातील सोनगिरी गावातील अंगणवाडी सेविका फरहा मुजावर यांचा आज सोनगिरी मोहल्ल्यातील महिलांनी आणि ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून गावातील सर्व महिलांना त्याचा लाभ मिळावा, कोणीही महिला कोणत्याही परिस्थितीत लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दिवसरात्र त्यांनी मेहनत घेतली. आणि विशेष म्हणजे सोनगिरी सारख्या दुर्गम भागात कोणत्याही वाडीमध्ये मोबाईल ला नेटवर्क येत नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोहचून त्यांनी योजनेची माहिती दिली आणि सर्व महिलांचे फॉर्म यशस्वी रित्या भरून पूर्ण केले, त्यांनी एकूण 200 च्या वर फॉर्म भरले आणि विशेष म्हणजे त्यांनी भरलेले सर्व फॉर्म अँप्रोव्ह झाले आणि गावातील बहुतांश महिलांचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झाले. त्यांना या कार्यात त्यांची मुलगी सामिया शेख हिने सुद्धा मोलाचे सहकार्य केले.
त्याचबरोबर गावातील इतर महत्वाच्या कामांमध्ये सुद्धा मुजावर मॅडम यांचा सहभाग असतो, त्यांनी वयोश्री योजनेचे सुद्धा गावातील 50 जेष्ठ नागरिकांचे फॉर्म भरून ग्रामपंचायत ला सहकार्य केले. यामुळे आज झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक आणि नवनियुक्त तंटा मुक्ती अध्यक्ष कासम मयेर यांच्या हस्ते फरहा मुजावर मॅडम चा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोळंबे सोनगिरी गावातील इतर अंगणवाडी सेविका निलम कांबळे मॅडम, मोरे मॅडम, लिंगायत मॅडम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रशासक भायनाक सर, पोलीस पाटील विनेश टाकळे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खातू गुरुजी यांनी केले.