पाली बसस्थानकात होते वाहतूक व्यवस्थापकपदी कार्यरत
चार दिवस घेतली होती सुट्टी
पाली:-तालुक्यातील पाली वळके येथे प्रौढाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र मधुकर सावंत (५६, वळके, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ते पाली येथील बस स्थानकात वाहतूक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने पाली परिसरासह स्थानकात खळबळ उडाली आहे. ते चार दिवस सुट्टीवर होते.
सविस्तर वृत्त असे की, रवींद्र सावंत हे बुधवारी दुपारी जेवण करून झाल्यानंतर जुन्या घरी जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी रवींद्र हे घरी न आल्यामुळे त्यांचे भाऊ सुरेश सावंत हे जुन्या घरी पाहण्यासाठी गेले. यावेळी त्यांना जुन्या घराच्या पडवीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन लोंबकळत असताना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती रवींद्र यांच्या मुलाला दिली. तो घटनेच्या ठिकाणी दाखल झाला. या प्रकाराने सारे पुरते भांबावून गेले. त्यांनी रस्सी खेचून रवींद्र याना खाली उतरवले. त्यांना लगेचच पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.