कोल्हापूर:-पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरे पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे आज त्याच्या गावी कोल्हापूरात पोहोचला. तब्बल ७२ वर्षांनंतर महाराष्ट्राकडे पदक जिंकवून आणण्याचा मान स्वप्नीलने पटकावला.
स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकले आणि इतिहास रचला. याच कारणासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे कोल्हापूरकरांनी जंगी स्वागत केले.
स्वप्नीलही फेटा बांघून पूर्ण मराठमोळ्या लूकमध्ये दिसला. कोल्हापूरात या ऑलिम्पिक चॅम्पियनच्या स्वागतासाठी हॅलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापुरकरांनी अगदी नादखुळ्या पद्धतीने स्वप्नीलची मिरवणुक काढली. त्याच्या स्वागतासाठी ढोल, ताशा, हलगी आणि झांज पथक या सगळ्याच्या गजरात थाटामाटात ताराराणी चौक ते दसरा चौकपर्यंत मिरवणुक काढली. कांबळवाडीसारख्या छोट्या गावातून इतक्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यापासून ते पदक मिळवणे त्याचा हा खडतर प्रवास खरंच लहान मुलांसाठी प्रोत्साहन देणारा आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढत त्याचा सत्कारही केला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांसह प्रमुख नेते उपस्थित होते. याआधी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे थाटामाटात स्वागत केले गेले होते.