नवी दिल्ली:-दिल्लीच्या प्रवर्तन निर्देशालयाच्या (ईडी) अधिकारी आलोक कुमार रंजन यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी साहिबाबाद रेल्वे रुळावर सापडला. आत्महत्या की घातपात, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, याची अधिक चौकशी सुरू आहे. मुंबईतल्या एका ज्वेलरच्या दुकानावर ईडीने काही महिन्यांपूर्वी टाकलेल्या छाप्याशी या घटनेचं कनेक्शन असल्याचं समोर येतंय. या छाप्यानंतर ज्वेलरच्या मुलाला अटक टाळण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून ईडीचे सहाय्यक निर्देशक संदीप सिंह यांना 7 ऑगस्टला सीबीआयने अटक केली होती. या प्रकरणात आलोक रंजन यांचेही नाव समोर आले होते, ज्यामुळे ते तणावाखाली होते. सीबीआयच्या तपासात आलोक रंजन यांचे नाव आल्यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण वाढलं होतं. त्यातच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही त्यांचं नाव जोडलं जात होतं. यामुळे त्यांच्या निलंबनाची शक्यता होती. या सर्व परिस्थितीमुळे त्यांनी जीवन संपवलं असावं, असा अंदाज आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ई़डीच्या या घटनेने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे, आणि पुढील तपासातूनच खरे कारण उघड होईल.