लांजा : देवगडहून चिपळूणकडे जाणारा 43 वर्षीय व्यक्ती लांजा बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील रहिवासी असलेला प्रदिप शंकर भातवकर (वय ४३) हा देवगड येथे कामाला असून तब्येत बरी नसल्याने तो ९ ऑगस्ट रोजी देवगडहून चिपळूण येथे आपल्या गावी चालला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र योगेश जनार्दन सैतवडेकर (वय ३५, रा.गोवळकोट भोईवाडी) हा देखील होता. हे दोघे चिपळूण येथे जात असताना ९ ऑगस्ट रोजी रात्री लांजा येथे उतरल्यानंतर लांजा एसटी बसस्थानक येथील एका टपरीवर हे दोघेजण झोपले होते. दरम्यान, प्रदिप भातवकर याने मित्राचा डोळा चुकवून काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला. तो परत आला नाही, म्हणून मित्र योगेश सैतवडेकर याने लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.
प्रदिप भातवकर याची उंची ५ फूट ५ इंच, चेहरा गोल, रंग गोरा, केस बारीक, अंगावर सफेद रंगाचा टी-शर्ट, काळया रंगाची फुल पॅन्ट, डाव्या हातावर मालती असे मराठी मध्ये गोंदलेले आहे. तसेच तोंडात खालील चार दात पडलेले असून उजव्या हाताच्या मनगटात काळया रंगाचा रबर आहे.
तरी सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.