राजापूर:-राजापूर तालुक्यातील नाटे गणेशनगर येथे मच्छीमारी जाळ्याचे सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे व 1 हजार किलो वजनाचे शिसे अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी आदिब कासम पावसकर (रा.साखरीनाटे) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिब पावसकर हे मच्छीमार व्यवसायिक हनिफ काझी यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे मच्छीमारी बंद असल्याने मच्छीमारी नौकेवरील सर्व जाळ्या नाटे गणेशनगर येथील मुजिब गोवळकर यांच्या बंदीस्त शेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मागील काही दिवसांपासून जाळ्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. जाळी दुरूस्तीकरीता सागवे कातळी येथील कामगार येत असतात. शनिवारी एका जाळीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने कामगारांनी शेडमध्ये झाकून ठेवलेली दुसरी जाळी दुरूस्तीसाठी घेतली. यावेळी सदरच्या जाळीला शिश्याचे छोटे रींग नसल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले.
कामगारांनी सदरची बाब मॅनेजर आदिब पावसकर व बोटमालक हनिफ काझी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आदिब पावसकर यांनी नाटे पालिसांत याबाबत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता 305 (अ), 331 (3), (4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.