खेड:-कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची 24 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी सुरत येथून गजाआड केलेल्या नारायणलाल शंकरलाल जोशी (42) या भामट्यास न्यायालयासमोर हजर केले असता 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या फसवणूक प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. येथील पोलिसांनी यापूर्वी धीरज महेंद्र नांगरा (रा.चंढीगड- हरियाणा) याला चंदीगड येथून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू होता. अखेर जोशी याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याने दिल्ली, बंगलोर, महाराष्ट्रातील अनेकांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. या फसवणूकप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? याचाही पडताळा पोलिसांकडून सुरू आहे.