आगार व्यवस्थापकांना विचारला जाब
लांजा : रत्नागिरी येथे उद्या बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला लांजा आगारातून १४५ बसेस वळविण्याचा निर्णयाविरुद्ध लांजा महाविकास आघाडीच्यावतीने आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन लांजा तालुक्यातील एसटी बसेस बंद न करण्यास विरोध केला आहे. आज बुधवारी शालेय विद्यार्थी एसटी फेऱ्या बंद झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्येक्रमासाठी लांजा तालुक्यातून १४५ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळताच लांजा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा एस.टी आगार येथे धडक दिली. आगार व्यस्थापक काव्या पेडणेकर यांची भेट घेऊन लांजा आगारातून एकही बस बंद रद्द करून शालेय विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी व नागरिकांची गैरसोय झाल्यास लांजा बस स्थानकात उद्या सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात येईल. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी लांजा आगार प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देऊन तसे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
तहसीलदार लांजा आणि पोलीस निरीक्षक लांजा यांना देखील या वेळी निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष अनंत जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख नागेश कुरूप, काँग्रेस शहराध्यक्ष रवी राणे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष धनिता चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहमद पावसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष शरीफ नाईक, शमा थोडगे, महिला शहराध्यक्ष विनया जगताप, नगरसेवक राजेश हळदणकर, स्वरूप गुरव, मंगेश मुळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सावंत, सरपंच परेश खानविलकर, वैभव जोईल, विजय जाधव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.