दापोली : तालुक्यातील पाज-पंढरी येथे बस व इनोव्हा कार यांच्यात अपघात होऊन कारचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश हरिश्चंद्र पेडणेकर यांनी आपल्या ताब्यातील इनोव्हा कार पाज-पंढरी रोडच्या बाजूला उभी केलेली होती. रविवारी संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास माणिक प्रल्हाद सांगळे हे दापोली आगाराची बस (एम.एच. 14 बी.टी. 2960) घेऊन जात होते. मात्र चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस चुकीच्या बाजूने चालवून इनोव्हा कारला ठोकर दिली. यामध्ये इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.