गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर सरपंच, ग्रामसेवक यांनी 29 फेबुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या बोगस निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुहागर पंचायत समितीने ग्रामसेविका श्रीमती अनिता चन्नाप्पा पाटील यांची एक वेतनवाढ थांबवण्याची कारवाई केली आहे.
तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या बोगस निविदा प्रसिद्धी प्रकरणी वेळणेश्वर येथील सुरेंद्र घाग यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मागील तारखांना निविदा प्रसिद्ध करण्याचे प्रकरण ग्रामसेवक व तात्कालीन सरपंच यांच्या चांगलेच अंगलट आले होते. यामध्ये सरपंचांनी राजीनामा दिल्याने याप्रकरणाच्या चौकशीनंतर वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती पाटील या एकट्याच या प्रकरणात अडकल्या आहेत. चौकशीमधून कोणतेही अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता न घेता एकदा निविदा प्रसिद्ध केल्याचे पुढे आले होते. ऐवढेच नव्हे तर ज्या 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या एका वृत्तपत्रातून निविदा छापली असे दाखवले आहे, त्या वृत्तपत्राच्या संपादकाने या तारखेला आपण कोणतीही निविदा प्रसिद्ध केली नसल्याचे पत्र दिले आहे. यामुळे विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये नियमबाह्य निविदा असल्याचे म्हटले होते. कारवाई करण्याअगोदर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेंना खुलासा मागितला होता. अखेर बोगस निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी ग्रामसेविका पाटील यांच्यावर एक वेतनवाढ थांबवण्याची कारवाई केली आहे.