चिपळूण : कोंढमळा येथे कामगार घेऊन जाणाऱ्या छोट्या टेम्पोला कंटेनरने धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे शनिवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन कामगार जखमी झाले असून कंटेनर चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरेंदर कुलदीप सिंग (35, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या अपघातात सागर सुभाष घाणेकर, संजय बारकू गडे (दोघे-कोंढमळा) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छोटा टेम्पोमधून सागर घाणेकर, संजय गडे हे कोंडमळा येथे त्याच्या घरी जात असताना ते टेम्पोच्या हौद्यामध्ये पाठीमागे बसले होते. मुंबई-गोवा महामार्गाने ते जात असताना छोटा टेम्पो कापसाळ येथील माटे सभागृहा समोर आला असता कंटेनरवरील चालक विरेंदर सिंग याने कंटेनर भरधाव वेगात चालवून टेम्पो गाडीच्या पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सागर घाणेकर, संजय गडे हे जखमी झाले. तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातापकरणी कंटेनर चालक विरेंदर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.