वाटद ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव व उल्लेखनीय व्यक्तिमत्वाचा सन्मान सोहळा!
वैभव पवार- गणपतीपुळे
आपल्या आयुष्यात आपली ओळख आपल्या देशाच्या नावाने जगभरात होत असते. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा यासाठी तत्पर असणे काळाची गरज आहे. आपल्या देशाबाबत, सैन्याबाबत आणि राष्ट्रपुरूष यांच्याबाबत आदर बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने देशासाठी जगता आले पाहिजे हीच खरी देशसेवा असते, असे मत माजी ओडिनरी कॅप्टन मंगेश मोहिते यांनी व्यक्त केले.
ते सरपंच अमित वाडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता १० वी आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच यशवंत किंजळे यांनी विद्यार्थ्यांसह ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कॅप्टन मंगेश मोहिते पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, माजी सैनिक रामचंद्र सावंत, जे. एस.डब्ल्यू. फाउंडेशनचे अनिल दधिच, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुदत्त निमकर, डॉ. अनिल मुळ्ये, डॉ. अनिल कांबळे, डॉ. श्रुती कदम, डॉ. राजेश जाधव सर, पोलीस महासंचालकांचे विशेष पदक विजेते संदीप साळवी, वाटद कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, सेवानिवृत्त सुपरवायझर आनंदा मुळ्ये, अथर्व पाटील, पदवीधर शिक्षक संदीप शितप, सामाजिक कार्यकर्ते शेखर भडसावळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार, महावितरणचे साईराज नागवेकर यांचा याप्रसंगी सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्प आणि झाडांचे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच इयत्ता दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानपत्र, शैक्षणिक साहित्य व स्कुलबॅग देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गंधर्व झगडे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाई जाधव, अनिल दधिच, कुलदीप पाटील यांनी आपल्या भाषणातून सरपंच आणि ग्रामपंचायतीचे कौतुक करताना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयश क्लासचे प्रभाकर धोपट यांनी केले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सरपंच अमित वाडकर यांनी सर्व तरुण विद्यार्थ्यांना आपल्या समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी यासाठी हा एकत्रित काम घेतल्याची माहिती देतानाच भविष्यात गावाच्या विकासासाठी आणि लोककल्याणासाठी कायम तत्पर राहणार असल्याचे ग्वाही दिली.
यानिमित्ताने वाटद मिरवणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाई जाधव यांनी सरपंच अमित वाडकर यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच राबविलेल्या या उपक्रमाबद्दल भारतीय संविधानाची प्रत देत सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच तथा ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आप्पा धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन ढवळे, राजेश जाधव, अनिकेत सुर्वे, भाई जाधव, माधव अंकलगे सर, ग्रामसेवक बुंदे साहेब, संदीप शिगवण, श्रावणी जंगम, प्रमोद शितप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला पोलीस संजय साळवी, उपसरपंच सुप्रिया नलावडे, ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा प्रसादे, पालये मॅडम, पोलीस पाटील सुधाकर शिर्के, संदीप भडसावळे, केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ, गावातील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.