रत्नागिरी : संरक्षण विषयक क्षेत्रातील नामांकित निबे कंपनी रत्नागिरीत लवकरच लष्करी साहित्याची निर्मिती करणार आह़े. यासंबंधी उद्योग विभाग व निबे कंपनी यांच्यातील सामंजस्य करार मंत्री उदय सामंत याच्या उपस्थितीत शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे रविवारी पार पडल़ा. निबे कंपनी रत्नागिरीत 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आह़े. यातून सुमारे दीड हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल़ी.
उद्योगविभाग याच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह येथे संरक्षण विषयक साहित्याचे प्रदर्शन व कार्यशाळेचे 18 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होत़े. याचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाइस ऍडमिरल सुनिल भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कंमाडर सौरभ देव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. देशाच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवर राहूनच देशसेवा करता येते असे नाही, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात, त्यातून देश सेवा घडू शकते. सैनिकांचा आदर सर्वांना असला पाहिजे. ते देशाच्या सीमेवर रक्षण करतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो, ही भावना सर्वांनी ठेवायला हवी. माजी सैनिकांचे देशाप्रती असणारे योगदान विसरुन चालणार नाही, असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवेत.