लांजा : शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकर वाघदरे ऊर्फ गजाभाऊ (८६) यांचे रविवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. लांजातील एक जाणकार साहित्यिक, विचारवंत असे सृजनशील व्यक्तिमत्व हरपल्याने लांजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकमान्य वाचनालय लांजेचे माजी कार्यवाह, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, लांजा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, लांजातील विविध सेवाभावी संस्थावर पदाधिकारी अशी त्यांनी विविध पदे भुषवली. चर्चा, मोर्चे, आंदोलने आणि संघर्ष हाच स्वभाव घेऊन आयुष्य जगणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे “साप्ताहिक आंदोलन तुमचे आमचे”चे संपादक, ज्येष्ठ साहित्यिक, संवेदनशील लेखक, लहान थोर सर्वांचे मार्गदर्शक एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असा वेगळा ठसा त्यांनी उमटविला. गजाभाऊ यांनी साप्ताहिक मधून अनेक सामाजिक प्रश्न व समस्या यावर परखड विचार वेळोवेळी व्यक्त केले. गजाभाऊ हे प्रा.मधु दंडवते यांचे सहकारी होते.
गजाभाऊ समाजवादी चळवळीतील एक समाजशील नेतृत्व. उत्तम लेखक म्हणून जितके ते निर्भीड तितकेच संवेदनशील देखील होते. दिवाळी अंक, प्रवास वर्णन, लेख, बातम्या, कविता आदींच्या माध्यमातून त्यांची लेखणी सतत बोलत राहिली. लांजात त्यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय असून त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.