देवरुख:-रत्नागिरी कोल्हापुर मार्गावरील आंबा घाटात अडीचशे फूट खोल दरीत शनिवारी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सड्याचा कडा या ठिकाणी खोल दरीत हे दोन अनोळखी मृतदेह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. स्वरूप दिनकर माने (24, रा. कवठेपिरान, सांगली ), प्रशांत श्रीरंग सातवेकर (19) अशी त्या दोघांची नावे आहेत. मृतदेहांची ओळख पटली पण त्यांचा मृत्यू कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ती आत्महत्या आहे की सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
शुक्रवारी कोल्हापूर शाहुवाडी येथील पोलीस आणि देवरुख येठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पाऊस आणि खोल दरीत मृतदेह असल्यामुळे काढणे अवघड झाले होते. देवरुख मधील रेसक्यू टीम ही दाखल झाली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास ही शोध मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर रविवार 18 ऑगस्ट रोजी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली.
घटनास्थळी मिळालेल्या दुचाकीवरून पोलिसांनी तरूणाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. घटनेची माहिती नातेवाइकांना दिल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह ओळखले.