दापोली : तालुक्यातील मांदिवली येथे लक्ष्मण भागोजी डेरे यांच्या जागेतील झाडे पूर्वपरवानगी न घेता तोडल्याप्रकरणी वसीम अहमद मुकादम याच्याविरुद्ध दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भागोजी डेरे यांच्या मालिकेच्या मांदिवली येथील जागेत कोणतीही परवानगी न घेता जेसीबीने वसीम मुकादम याने झाडे तोडून जमिनीचे सपाटीकरण केले. तसा खोदकाम करून रस्ता तयार केला आहे. या जागेमधील काजू, आंबे, हरड, किंजळ, शिवण, खैर अशी झाडे तोडली आहेत. याच जागेला लागून असणारे दिलदार रशीद बांगी ,धोंडू पांडुरंग सावंत, कृष्णा निंबरे यांच्या मालकीच्या जमिनीमधीलही झाडे परवानगीशिवाय तोडली असल्याचे लक्ष्मण डेरे यांनी आपल्या फिर्यादित नमूद केले आहे. डेरे यांच्या जागेत पोकलेन मशीन उभे करून ठेवल्याने या बाबत डेरे यांनी विचारणा केली असता वसीम मुकादम याने शिवीगाळ करीत अपमान केला. आम्ही मायनिंग कंपनीसाठी काम करीत आहोत, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, असे बोलून माझा पोकलेन मी येथेच ठेवणार तो तुमच्या जागेतून काढणार नाही, असे म्हणत मारण्याची धमकी दिल्योही डेरे यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. हा सर्व प्रकार 3 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या मुदतीत घडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वसीम मुकादम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.