मंडणगड:-मंडणगड शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अठरा वर्षीय युवतीस घराशेजारी राहणाऱ्या युवकाने मंडणगड बाजारपेठेतून अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी शुक्रवारी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल दिली. त्यावरुन नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेवाडी येथील अल्ताब बशीर शेख याच्याविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, अपहरण झालेली युवती सकाळी 7.45 वाजात नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. ती नेहमी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घरी परत येते. मात्र नेहमीच्या वेळी घरी परत न आल्याने फिर्यादी वडीलांनी तिला शोधण्यासाठी महाविद्यालयात जाऊन तिच्याविषयी चौकशी केली असता ती महाविद्यालयात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणी, शहरातील बाजारपेठ, शेजारी व नातेवाईक अशा सर्व ठिकाणी शोध घेतला असता काहीही माहिती मिळू शकली नाही. अधिक शोध घेतला असता संशयित युवकाने मुलीस सकाळी 07.45 वाजता मंडणगड बाजारपेठेतून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तिला पळवून नेले असल्याचे फिर्यादी पित्यास समजले. त्यामुळे संशयित युवकाविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा
नोंद करुन पोलीसांनी तपास सुरु केला आहे.